विशाखाट्टणमच्या निधी बोईपोटूने आपल्या अनोख्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. निधी बोईपोटू या 9 वर्षाच्या चिमुकलीने तिच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक पदकं फतेह केले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या मन की बात रेडिओ संबोधनात तिचे कौतुक केले होते.
निधी सहा वर्षाची असताना ती कॅन्सरग्रासित असल्याचे आढळून आले. तिच्या पायामध्ये सार्कोमा नावाचा कॅन्सर होता. लहानग्या वयात चिमुकलीला मोठ्या आजाराला सामोरे जावे लागत होते. याने निधीच्या घरातले फार खचून गेले होते. त्यांनी स्वतःला संपवून घेण्याचाही विचार केला असं निधीच्या आईचे म्हणणे आहे. पण आई ती आई असते, आपल्या चिमुकलीसाठी त्या खंबीर झाल्या आणि मृत्यूच्या दारातून निधीला बाहेर काढले. "जर मनात जिद्द असेल तर काही अशक्य नाही", हे निधीने जगाला दाखवून दिले. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षात तिने जलतरण , बुद्धिबळ व धावण्यामध्ये तीन सुवर्ण पदक व रायफल नेमबाजीत कांस्य पदक पटकावले.
निधी सारखी अनेक लोकं आहेत जे मोठया आजारांशी झुंज देत आहेत, अनेक अडचणींचा सामना करत आहेत. अशा गोष्टींना सामोरे जात असताना अनेक लोकं खचून जात आहेत. निधी अशा लोकांसाठी एक आदर्श बनली आहे. "मनात हिम्मत व इच्छाशक्ती प्रबळ असेल तर व्यक्ती कशावरही विजय मिळवू शकतो!" हे निधीने दाखवून दिलं आहे.
